बांगलादेशातील हिंदूंसह अन्य अल्पसंख्यकांवरील
ताजा खबरों से अपडेट रहने के लिए हमारे Whatsapp Channel को Join करें |
बांगलादेशातील हिंदू, बौद्ध, जैन, शीख आणि अन्य अल्पसंख्यांवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ नागपुरातील सकल हिंदू समाजाने भव्य निदर्शनं आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भारताच्या पंतप्रधानांना निवेदन सादर केलं.
हिंदूंवरील अत्याचार थांबविण्यासाठी भारत सरकारने कठोर भूमिका घ्यावी आणि बांगलादेश सरकारला जिहादी कट्टरवाद्यांविरोधात तातडीने पावलं उचलण्यास भाग पाडावं, अशी मागणी हिंदू समाजाने केली.
नागपूर, १० डिसेंबर/जिहादी मानसिकतेच्या कट्टरपंथी मुस्लिमांकडून बांगलादेशातील हिंदू, बौद्ध, शिख, जैन आणि अन्य अल्पसंख्यकांवर होणाऱ्या अत्याचारांचा नागपुरातील सकल हिंदू समाजातर्फे तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. निदर्शकांनी सहा बाईक रॅली आणि एक भव्य सभा आयोजित करून आक्रोश प्रकट केला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भारताच्या पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले.
हिंदूंवरील अत्याचार ताबडतोब थांबावे, बांगलादेशातील स्थिती पूर्वपदावर यावी आणि तेथील सर्व अल्पसंख्य समाजाचे जीवन सुकर आणि सुरक्षित व्हावे, यासाठी सकल हिंदू समाजातर्फे भारत आणि बांगलादेश सरकारकडे अनेक मागण्या केल्या आहेत. हिंदू, बौद्ध, शिख, जैन आणि अन्य अल्पसंख्यकांवरील हल्ले, अत्याचार थांबावेत म्हणून भारत सरकारतर्फे बांगलादेश सरकारला कठोर इशारा दिला जावा तसेच मानवाधिकारवादी संघटनांनी हा मुद्दा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर लावून धरावा, अशी मागणी सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आली आहे.
बांगलादेशातील हिंदूंच्या जिविताची आणि संपत्तीची रक्षा तसेच महिलांवरील अत्याचारांच्या घटनांना पायबंद घातला जावा, यासाठी बांगलादेश सरकारने तातडीने पावले उचलावी. इस्कॉनचे साधू चिन्मय कृष्ण दास यांची तुरुंगातून तत्काळ ससन्मान मुक्तता करण्यात यावी. हिंदू, बौद्ध, जैन, शिख आणि इतर अल्पसंख्य समाजातील कलाकार, व्यावसायिक, उद्योगपती, खेळाडू, राजकीय नेते तसेच हिंदू मंदिरांना सुरक्षा पुरविली जावी. बांगलादेशातील पाकिस्तानी जिहाद्यांच्या हस्तक्षेपाला पायबंद घालावा. संयुक्त राष्ट्रसंघात हिंदूंवरील अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला जावा तसेच बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणाची मागणी करणाऱ्या देशोदेशीच्या विविध आंदोलनांना सुरक्षा प्रदान केली जावी, अशा मागण्याही सकल हिंदू समाजातर्फे निवेदनामार्फत करण्यात आल्या आहेत.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ५ ऑगस्ट २०२४ पासून बांगलादेशात जिहादी कट्टरवाद्यांनी अस्थिरता निर्माण केली आहे. तसेच त्यांनी शेख हसीना सरकार उलथवून टाकले आहे. आता तर हिंदूंवरील हल्ले आणि अत्याचार अधिकच वाढले आहेत. आजवर बांगलादेशातील 50 जिल्ह्यांत हिंदूंसह इतर अल्पसंख्यकांवर दोनशेहून अधिक हल्ले झाले आहेत. हिंदू व्यावसायिक, हिंदू कलाकार, हिंदू नेत्यांच्या हत्या करण्यात आलेल्या आहेत. बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात उभे झालेले इस्कॉनचे साधू चिन्मय कृष्ण दास यांच्यावर राष्ट्रध्वजाच्या अवमानाचा खोटा आरोप लावून त्यांना अटक करण्यात आली आहे.
निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, बांगलादेशातील सत्तापरिवर्तनानंतर हिंदू आणि इतर अल्पसंख्यकांवर तेथील जिहादी प्रवृत्तींकडून हल्ले करण्यात आले आहेत. अल्पसंख्यकांची घरे, व्यावसायिक आस्थापनांची जाळपोळ आणि लूटमारीच्या अनेक घटना नोंदविल्या गेल्या आहेत. मंदिरांमध्ये चोऱ्या आणि देवतांच्या मूर्तींच्या विटंबनेच्या घटनाही ठिकठिकाणी झाल्या आहेत. महिलांवर बलात्कार, त्यांच्याशी लैंगिक दुर्व्यवहार आणि त्यांच्या मृतदेहांची विटंबनाही केली जात आहे. दुर्दैवाने, या घटनांतील दोषी मोकाट फिरत आहेत आणि वैधानिक व शांततापूर्ण मार्गाने लढा देणाऱ्या हिंदूंच्या धार्मिक नेत्यांनाच दोषी ठरविले जात आहे. हल्लेखोरांविरुद्ध कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलिस बिचकत आहेत तर काही ठिकाणी ते गुंडांमध्ये सामील झाले आहेत. शांतीपूर्ण निदर्शकांवरच अवैध मागण्या करीत असल्याचे आरोप जडले जाऊ लागले आहेत.
गाझा, सीरिया, लेबनॉनमधील घटनांबद्दल चिंता व्यक्त करणारे बॉलिवूड कलाकार आणि आपल्या देशातील मानवाधिकारवादी बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांबद्दल मूग गिळून आहेत, याकडेही सकल हिंदू समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात लक्ष वेधले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना सोपविलेल्या निवेदनावर सकल हिंदू समाजाचे संयोजक अमोल ठाकरे यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक राजेश जी लोया, विदर्भ प्रांत संपर्क प्रमुख अरविंद जी कुकडे, नागपूर महानगर कार्यवाह रवींद्र बोकारे, संजय जी भेंडे, प्रगती पाटील, श्रीमंत राजे मुधोजी भोसले, श्रीमंत माता राजेश्वरी, महंत भगीरथ महाराज, ह.भ.प. श्रीरामपंत जोशी, १००८ श्री प. पू. महामंडलेश्वर माधवदास महाराज, प. पू. निर्मलानंद महाराज, प. पू. गणू दास महाराज, प. पू. महंत सूर्यानंदजी महाराज, महंत शिवानंद जी महाराज, डॉ. सुबोध विश्वास, रमेश जी मंत्री, वृषाली जोशी यांच्यासह समाजातील विविध जाती-पंथांच्या गणमान्य व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या आहेत.