अमरावतीत सकल हिंदू समाजातर्फे

Tue 10-Dec-2024,08:37 PM IST +05:30

ताजा खबरों से अपडेट रहने के लिए हमारे Whatsapp Channel को Join करें |

Follow Us

अमरावतीत सकल हिंदू समाजातर्फे बांगलादेशातील अत्याचारांचा निषेध
  • बांगलादेशातील हिंदू, बौद्ध, जैन, शिख आणि अल्पसंख्यकांवर होणाऱ्या अत्याचारांचा अमरावतीत सकल हिंदू समाजातर्फे तीव्र निषेध, रॅलीद्वारे हजारोंचा प्रतिसाद.

  • इस्कॉन संत चिन्मय कृष्ण प्रभू दास यांची अटक, हिंदू अत्याचारांविरोधात आवाज उठवण्यासाठी प्रमुख वक्त्यांचे आवाहन आणि तहसीलदारांना निवेदन सुपूर्द.

Maharashtra / Amravati :

अमरावती, १० डिसेंबर/बांगलादेशात हिंदूंसह बौद्ध, जैन, शिख आणि अन्य अल्पसंख्यक समाजावर होणाऱ्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ अमरावती येथे सकल हिंदू समाजातर्फे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. इस्कॉनचे संत चिन्मय कृष्ण प्रभू दास यांची अटक व हिंदूंवर होणाऱ्या अत्याचार व सुरक्षेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हजारोंच्या संख्येत अमरावतीकर नागरिक रस्त्यावर उतरले. संतांनी व उपस्थित मान्यवरांनी जयस्तंभ चौकातील महात्मा गांधीच्या पुतळ्याला माल्यार्पण करून निषेध मोर्चाला सुरवात केली. रॅली जयस्तंभ चौकातून, सरोज चौक मार्गे श्याम चौकातून राजकमल चौकात आली. राजकमल चौकात उपस्थित प्रचंड जनसमुदायाला प्रमुख व्यक्त्यानी संबोधित केले.

निषेध मोर्चाला जनतेने हजारोंच्या संख्येने प्रतिसाद दिल्याने शहरात हिंदू एकतेची शक्ती लक्षणीयरित्या दिसून आली. संपूर्ण शहरातील हिंदुत्ववादी वातावरण बघता सकल हिंदू समाज बांगलादेशी हिंदूंच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. प. पू. संदीप मुनी जैन महंत, प.पू. संत राजेशलाल साहेब, प.पू. नित्य हरिनाम प्रभुजी इस्कॉन, ह .भ. प.ज्ञानेश्वर महाराज पातशे तसेच विश्व हिंदू परिषदेचे विभाग संघटनमंत्री बंटी पारवानी सभास्थानी मंचावर उपस्थित होते. मुख्य वक्ता म्हणून प्रा. डॉ सतीश चाफले यांनी संबोधित केले. हजारो वर्षांपासून हल्ले होत असतानाही हिंदू संघर्ष करीत राहिला आहे. परंतु आज बांग्लादेशात हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आज हिंदू रस्त्यावर उतरला आहे. बांग्लादेश सरकारने कट्टरपंथी लोकांना थांबवावे अन्यथा हिंदू समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा निर्वाणीचा इशारा डॉ. चाफले यांनी दिला.

बंटी पारवानी यांनी बांगलादेशातील हिंदू समाजाची व्यथा अमरावतीकर नागरिकांसमोर मांडली तसेच बांगलादेशातील हिंदू, जैन, शीख, बौद्ध व इतर अल्पसंख्यक नागरिकांना न्याय मिळवून देण्याची विनंती सरकारला केली. अमरावती शहरातील सर्व हिंदू संघटनांचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसेच मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने बांगलादेशातील प्रताडीत हिंदूंना समर्थन देण्यासाठी उपस्थित होते. शहरातील विविध राजकीय, सामजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक तसेच विविध महिला संघटनांचे नेते व कार्यकर्त्यांची लक्षणीय संख्यने उपस्थिती होती. यानंतर शिष्टमंडळाने विभिन्न क्षेत्रातील तसेच पंथ-उपपंथातील मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन तहसीलदार निलेश खटके यांना सुपूर्द केले.