बांग्लादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध आंदोलनाचा निर्णय

Fri 06-Dec-2024,10:51 PM IST +05:30

ताजा खबरों से अपडेट रहने के लिए हमारे Whatsapp Channel को Join करें |

Follow Us

बांग्लादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध आंदोलनाचा निर्णय बांग्लादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध आंदोलनाचा निर्णय
  • सकल हिंदू समाजाच्या सुकाणू समितीची स्थापना

     

  • ६ बाईक रॅलीज आणि भव्य मोर्चाचे आयोजन

Maharashtra / Nagpur :

नागपूर, ६ डिसेंबर/बांगलादेशातील हिंदू, बौद्ध, जैन आणि अन्य अल्पसंख्यकांवर होणारे हल्ले, त्यांच्या हत्या आणि उत्पीडनाच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन पुकारण्यात येणार असून, यासाठी एका सुकाणू समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनांतर्गत येत्या १० डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने नागपुरातील सहा विविध स्थानांहून बाईक रॅली काढण्यात येणार असून, एका भव्य मोर्चाचेही आयोजन करण्य़ात आले आहे.

४ डिसेंबर रोजी एम्प्रेस मॉल परिसरातील इस्कॉन मंदिरात सकल हिंदू समाजाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय समितीचे महंत भगीरथ महाराज बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी रामचरण महाराज दुबे, राजे मुधो जी भोसले, कल्याणेश्वर मंदिराचे गुणवंत पाटील, सिंधी परिषदेचे घनश्यामदास कुकरेजा, रमेश मंत्री, मारवाडी समाजाचे अशोक अग्रवाल (गोयल),  इस्कॉन नागपूरचे प्रतिनिधी तन्मयदासप्रभू आणि डॉ. श्यामसुंदर शर्मा, अखिल भारतीय वाल्मिकी महासभेचे अध्यक्ष रवी करोसिया, दत्ता शिर्के, गोल्डीसिंग तुली, चैताली खटी, अधिवक्ता पारिजात पांडे, नागपुरातील आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध

मंदिरांचे विश्वस्त उपस्थित होते.
डॉ. श्यामसुंदर शर्मा यांनी बांगलादेशातील सद्य परिस्थितीची माहिती दिली. ते म्हणाले, इस्कॉन आणि आर्ट ऑफ लिविंग या संस्थांनी १९७१ च्या दुष्काळात लाखो बांगलादेशी नागरिकांना चार महिने भोजनदान केले. त्याच इस्कॉनच्या चिन्मयदास प्रभूंना बांगलादेश पोलिसांनी राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली. त्यांना कायदेशीर मदत मिळू नये म्हणून त्यांच्या वकिलाचीही हत्या करण्यात आली.
महंत भगीरथ महाराजांनी अध्यक्षीय भाषणातून सर्व हिंदूंनी जाती, पंथ, प्रांत, भाषा आदी भेद विसरून एकत्र यावे असा संदेश दिला. ‘बटेंगे तो कंटेंगे’ या मंत्राची त्यांनी आठवण करून दिली. सर्वांना एकत्र राहण्याचे आणि मोठ्या प्रमाणात मोर्चाला उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

नागपुरात सहा बाईक रॅली
बांगलादेशातील हिंदू, बौद्ध, जैनांसह अन्य अल्पसंख्यकांवर होणाऱ्या अत्याचारांचा निषेध करण्यासाठी १० डिसेंबरला सहा बाईक रॅलीज आणि एक भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या बाईक रॅलीज दुपारी २ वाजता नागपुरातील विविध स्थानांवरून निघतील. मध्य नागपुरातील बाईक रॅली बडकस चौकातून, पूर्व नागपुरातील रॅली सतरंजीपुरा चौकातून, उत्तर नागपुरातील रॅली कमाल टॉकिज चौकातून, पश्चिम नागपुरातील रॅली छावणी चौकातून, दक्षिण पश्चिम नागपुरातील रॅली अजनी चौकातून तर दक्षिण नागपुरातील बाईक रॅली सक्करदरा

चौकातून निघेल. 
मध्य व पूर्व नागपुरातील बाईक रॅली टेकडी गणेश मंदिर, मानस चौक येथे,  उत्तर व पश्चिम नागपुरातील बाईक रॅली संविधान चौकात तर दक्षिण पश्चिम व दक्षिण नागपुरातील रॅली यशवंत स्टेडियम येथे एकत्र होतील. तेथून रॅलीमध्ये उपस्थित सर्वजण व्हेरायटी चौकाच्या दिशेने पायी मार्गक्रमण करतील, असा निर्णय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. कल्याण मंत्रानंतर बैठकीचा समारोप झाला. बैठकीला मोठ्या संख्येने सकल हिंदू समाजातील लोक उपस्थित होते.